मुख्यमंत्री फडणवीसच, पण विदर्भातील किती आमदार होणार मंत्री?

मुख्यमंत्री फडणवीसच, पण विदर्भातील किती आमदार होणार मंत्री?

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता विदर्भातील कीती आमदार मंत्री होतील, याचीच चर्चा रंगली आहे. युतीची सत्ता स्थापन होऊन मुख्यमंत्री फडणवीसच राहतील यात शंका नाही. मात्र, या निवडणुकीमध्ये भाजपच्या दिग्गजांचा पराभव झाल्याने दुसऱ्या फळीतील नेत्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत.

विदर्भात गेल्या वेळेस भाजपने भरपूर मंत्री आणि राज्यमंत्री दिले होते. त्या तुलनेत यावेळीसुद्धा मंत्रीपदे मिळतील काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपने 15 जागा गमावून 29 जागांवर विजय मिळविला. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. युतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करेल, हे सांगायची गरज नाही. निवडून आलेल्या आमदारांना आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. मुख्यमंत्री नागपूरचा असल्याने विदर्भातील आमदारांनी मंत्रिपदासाठी सेटिंग सुरू केली आहे.

गेल्या वेळी गोंदियातून राजकुमार बडोले यांना कॅबिनेट पदाची बढती मिळाली होती. त्यानंतर परिणय फुके यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. परंतु, यावेळी दोन्ही नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, परिणय फुके हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार असल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्‍यता आहेत. तर तिरोड्‌याचे आमदार विजय रहांगडाले यांचे नाव सुद्धा सध्या चर्चेत आहे. 

चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात राहतील. तर यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे मदन येरावार, प्रा. उईके, आणि शिवसेनेचे संजय राठोड हे पुन्हा मंत्री होतील, यावर चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून संजय राठोड यांच्या बढतीचे संकेत आहेत. त्यांना कॅबिनेट मिळण्याची शक्‍यता आहे. तर आदिवासी मंत्री म्हणून प्रा. उईके यांची वर्णी लागू शकते. अमरावती जिल्ह्यात भाजपचे अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप अडसड निवडून आले आहेत. ते नव्या दमाचे असल्याने त्यांना संधीची आशा आहे. वर्धा येथून पंकज भोयर, समीर कुणावार आणि दादा केचे निवडून आले आहेत. यातील पंकज भोयर आणि समीर कुणावार यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. 

नागपूर जिल्ह्यातून समीर मेघे यांच्यासाठी संधी आहे. गेल्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश होता. एवढेच नव्हेतर ऊर्जा, कामगार यासारखे महत्त्वाचे खातेही त्यांच्याकडे होते. तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही होते. यावेळेस त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांच्याऐवजी समीर मेघे यांना मंत्रिमंडळात घेतील, अशी चर्चा आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील अंबरीशराव आत्राम यांचा पराभव झाल्याने त्यांच्या ऐवजी देवराव होळी किंवा कृष्णा गजबे यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार होऊ शकतो.

बुलडाणा जिल्ह्यातून आकाश फुंडकर यांच्या नावाची चर्चा आहे. अकोला येथून गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. वाशीममधून लखन मलिक यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तर संजय कुटे हे कामगारमंत्री होते. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्‍यता आहे.

Web Title : How Many Vidharbha MLA Will Get cabinet ministers Post ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com